रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सभासद पत्रकारांसाठी एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन परिषदेतर्फे सर्व सभासदांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवारी १८ जुलै रोजी माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.
बदलत्या हवामानात आणि मुसळधार पावसातही पत्रकार आपली कर्तव्यभावना जपून ग्राउंड झीरोवरून बातम्या पोहोचवण्याचे काम अविरतपणे करत असतात.
अशा वेळी त्यांना मैदानावर काम करताना सुलभता व्हावी आणि त्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरीतील मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू यांनी या छत्र्या उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीरित्या साकार झाला.
या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि तालुक्यातील सभासद पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील बांधिलकी आणि आपुलकी वाढवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

