रत्नागिरी: बंगळुरू पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका पीडित महिलेची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. गगनदीप भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील पीडित महिलेचे मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँकेत खाते आहे. या खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची भीती आरोपींनी फिर्यादीला घातली होती.
या चौकशीसाठी त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगून आरोपींनी ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली.
आरोपींच्या धमक्यांना बळी पडून पीडित महिलेने तब्बल १ कोटी २३ लाख रुपये गमावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा संवेदनशील आणि सायबर फ्रॉडशी संबंधित असल्याने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले.
तसेच स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली, नोएडा येथून आरोपी गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आणि आरोपीला अटक करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी केली.
या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही पोलीस, सीबीआय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा इतर शासकीय विभागातून बोलत असल्याचे सांगून बँक अकाऊंट किंवा सिमकार्डचा गैरवापर झाल्याची भीती घालत असेल, तर घाबरून जाऊ नका.
अकाऊंट व्हेरीफिकेशनच्या नावाखाली पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले तर अशा कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपली वैयक्तिक किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका आणि अशा धमक्यांना बळी न पडता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

