कर्जत: कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर बनत असताना कर्जत नगरपरिषदेने यावर एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत तोडगा शोधून काढला आहे.
शहरात जमा होणाऱ्या प्लॅस्टिक, रबर आणि बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्याचा (सी अँड डी वेस्ट) पुनर्वापर करून थेट रस्ते बांधणीसाठी वापर करण्याचा यशस्वी प्रयोग नगरपरिषदेने केला आहे.
कचऱ्याला कचरा न समजता कच्चे साहित्य म्हणून पाहिल्यामुळे शहरात पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे.
कर्जत शहरात दररोज सुमारे ४ टन सुका कचरा तयार होतो. नगरपरिषदेने १०० टक्के कचरा वर्गीकरण आणि संकलन मोहीम राबवून हा सर्व कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापासून रोखला आहे.
या अंतर्गत बांधकाम आणि पाडकामातून निघणाऱ्या ढिगाऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने एक टोल-फ्री क्रमांक देखील जारी केला आहे, ज्यावर संपर्क साधून नागरिक आपल्या भागातील राडारोडा उचलण्याची विनंती करू शकतात.
पालिकेची वाहने हा कचरा संकलित करून प्रक्रिया केंद्रात पोहोचवतात.

या प्रक्रिया केंद्रात भागीदारी तत्त्वावर काम चालते, जिथे गोळा केलेल्या राडारोड्यामध्ये टाकाऊ प्लॅस्टिक आणि रबर मिश्रित केले जाते.
या मिश्रणातून अत्यंत मजबूत आणि टिकाऊ पेव्हर ब्लॉक तसेच गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) तयार केले जात आहेत. हे गतिरोधक पारंपारिक सिमेंट-काँक्रीटच्या गतिरोधकांपेक्षा अनेक पटीने सरस ठरत आहेत.
वजनाने हलके असल्यामुळे ते वाहून नेणे आणि रस्त्यावर बसवणे अत्यंत सोपे आहे. तसेच, अतिनील किरण (युव्ही रेज) आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या गतिरोधकांना तडे जात नाहीत किंवा ते सुटत नाहीत.
कर्जत नगरपरिषदेने हे पुनर्नवीकरण केलेले गतिरोधक सार्वजनिक रस्ते आणि महामार्गांवर यशस्वीपणे बसवले आहेत.
या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे शहरासमोरील कचरा व्यवस्थापनाचे मोठे संकट तर टळले आहेच, शिवाय रस्ते दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
कचऱ्यातून समृद्धीकडे नेणारा हा प्रकल्प आधुनिक दळणवळणाच्या गरजा पूर्ण करतानाच पर्यावरण रक्षणाचा एक उत्तम वस्तुपाठ ठरत आहे.

