रत्नागिरी : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिली.

नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील दिव्यांग संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, स्वयंरोजगार, आरोग्य सुविधा, सहाय्यभूत साहित्य आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी बोलताना विलास चाळके यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

तसेच दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील.

नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची आणि स्वतंत्र समन्वय यंत्रणा उभारण्याची मागणी केली.