रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आता कोकणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

टोलनाक्याच्या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या २५ मे पासून याठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने येत्या ३१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘कोकणकर रस्त्यावर उतरणार, खारपाडा टोल बंद करूनच राहणार’ असा ठाम निर्धार व्यक्त करत हे आंदोलन उभारण्यात आले आहे. रविवारी, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता खारपाडा टोलनाका येथे हे भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या निर्णायक लढ्यासाठी आणि टोलमुक्तीच्या मागणीला बळ देण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.