आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरट्यांनी नियोजित कट रचून पहाटे २ ते २:३० च्या सुमारास मंदिरात प्रवेश केला आणि मुख्य गाभाऱ्यातील मोठी दानपेटी उचलून नेली.

मंदिराच्या शेजारीच बुरुजाचे बांधकाम सुरू असल्याने चोरट्यांनी त्या निर्जन ठिकाणाचा फायदा घेतला. तिथे नेऊन दानपेटी कशाच्या तरी साहाय्याने फोडली आणि त्यातील सर्व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

सकाळी ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिराकडे धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.

या फुटेजच्या आधारे आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रावून तपास सुरू केला आहे.

कड्यावरचा गणपती सारख्या प्रसिद्ध मंदिरात अशी घटना घडल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*