देवरुख : येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांवर आपले नाव कोरले.

संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य दाखवत स्वर्णीम श्रेयस शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार व तेजस्वी दशरथ लाड यांनी सुवर्णपदके पटकावली.

तर अमायरा मोहसीन अपराध, माऊली तुषार चव्हाण व वृत्ती रंजन पावसकर यांनी कांस्यपदक मिळवून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

पदकविजेत्यांशिवाय युगा प्रसाद डोर्ले, अन्वी सचिन पवार, आदी रंजन पावसकर, दीपराज युवराज खानविलकर, तनया संदीप पाटकर, आर्या सचिन पवार, सात्विक श्रेयस साळुंखे, रीया प्रमोद लांजेकर, आराध्य कमलाकर सावंत व आदिश्री अभय शेट्ये यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय खेळ केला.

स्पर्धेत लांजा अकॅडमीच्या सचिव आणि राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, प्रमुख प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर व सहप्रशिक्षक गौरव दीपक खेडेकर आणि गणेश ईश्वर तोंडारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशानंतर तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा व गुरुकुल अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, लक्ष्मण कर्रा आणि मार्गदर्शक तेजस वडवळकर यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनीही विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.