रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा आगामी एक किंवा पाच तारखेला होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत बँकेच्या संचालक मंडळाच्या जागा २१ वरून २५ करण्यात आल्या आहेत. या वाढीव चार जागांपैकी किमान दोन जागा भाजपला मिळाव्यात, अशी आग्रही भूमिका पक्षाकडून घेण्यात आली आहे.
बँकेत भाजपचे संख्याबळ वाढावे आणि सहकार क्षेत्रात पक्षाचा शिरकाव अधिक मजबूत व्हावा, यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
या वाढत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गेल्या वीस वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले आणि सलग दोन टर्म बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेले भाजप नेते वैभव खेडेकर यांनी पुन्हा एकदा संचालक पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण, विनय नातू आणि रत्नागिरीचे नेते दीपक पटवर्धन यांच्याशी पत्रव्यवहार करून आपली मागणी लावून धरली आहे.
याशिवाय, महायुतीचे नेते किरण सामंत, रामदास कदम आणि उदय सामंत यांच्यापर्यंतही त्यांनी हा विषय पोहोचवला आहे.
सहकार क्षेत्रातील आपला प्रदीर्घ अनुभव आणि पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेता, पक्षनेतृत्व योग्य तो निर्णय घेऊन आपल्याला संचालक म्हणून पुन्हा एकदा संधी देईल, असा ठाम विश्वास वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.

