लांजा : येथे राज प्रोडक्शन लांजा प्रस्तुत राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा लहान आणि मोठ्या अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन स्वरूपात पार पडली, ज्यामध्ये ८० पेक्षा जास्त हौशी कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी लहान गटातील १९ तर मोठ्या गटातील २४ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

या सर्व निवडक स्पर्धकांची अंतिम फेरी १२ जुलै २०२६ रोजी लांजा येथील माऊली सभागृहात पार पडली.

या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात किरण उर्फ भैय्या सामंत आणि अखिल नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. अंतिम फेरीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते असित रेडीज आणि कलाकार सुनील बेंडखळे उपस्थित होते. तसेच लांजा शहराच्या नगराध्यक्षा सावली कुरूप आणि इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

संपूर्ण स्पर्धेचे सुरेख आणि उत्तम सूत्रसंचालन ऐश्वर्या बापट यांनी केले. या स्पर्धेचे अचूक आणि योग्य परीक्षण भूषण बागुल आणि शेखर मुळ्ये या मातब्बर कलाकारांनी केले.

या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनात संस्थेचे संस्थापक संतोष शेट्ये, स्पर्धाप्रमुख राहुल तोडकरी यांच्यासह सागर शेट्ये, संतोष कोंडकर, वीरेश साडविलकर, प्रफुल जाधव, भाग्यश्री हेडाऊ, वैभव पाटकर आणि अतुल शिर्के यांनी परिश्रम घेतले. तसेच लांजा शहरातील आणि तालुक्यातील अनेक स्थानिक उद्योजकांनी या स्पर्धेला प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत लहान गटामध्ये सई तोडणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर अथर्व शिंगारे (लांजा) याने द्वितीय आणि आरोही शिंदे (वेरवली, लांजा) हिने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय लहान गटात अर्णव जाधव (वेरवली, लांजा) आणि दूर्वा अभ्यंकर (लांजा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मोठ्या गटामध्ये शुभम गोविलकर (रत्नागिरी) याने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. तर राधा टिकेकर (रत्नागिरी) हिने द्वितीय आणि प्राजक्ता ठाकूरदेसाई (खारेपाटण, सिंधुदुर्ग) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

मोठ्या गटात प्रशांत पाटील आणि कुंदन सागवेकर (रत्नागिरी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. विजयी स्पर्धकांसह इतरही सर्व सहभागी स्पर्धकांनी एकापेक्षा एक उत्तम सादरीकरण करत या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेची रंगत वाढवली.