रत्नागिरी: ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात अंगणवाडी नूतनीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण १९ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी रत्नागिरी तालुक्यातील गोळप–दाभिळवाडी आणि कोळंबे–बागवाडी येथील नूतनीकरण केलेल्या दोन अंगणवाड्यांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

फिनोलेक्स कंपनीच्या ४५ वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून हाती घेण्यात आलेला हा उपक्रम मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत गोळप–दाभिळवाडी आणि कोळंबे–बागवाडी येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले.

या कामामध्ये आवश्यक बांधकाम दुरुस्ती, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, आकर्षक रंगकाम, बालकांना ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि बालमैत्रीपूर्ण झाला आहे.

अंगणवाडी ही बालकांच्या शिक्षणाची आणि सामाजिक जडणघडणीची पहिली पायरी असल्याने, ग्रामीण भागातील बालकांना शिक्षणासाठी अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.

आकर्षक बोलक्या भिंती, सुधारित पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक साहित्यामुळे बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सावंत, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ईसीएफ प्लांट हेड नामदेव देशमुख, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे आणि सिव्हिल विभागाचे विकास कुरतडकर उपस्थित होते.

तसेच स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुल माधव फाऊंडेशनच्या सीएसआर विभागाचे शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अंगणवाडी पायाभूत सुविधांना बळकटी मिळत असून, बालकांच्या प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक दर्जेदार आणि बालस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.