रत्नागिरी : शहरातील के. सी. जैन नगर आणि मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मिनी मॉलला भाऊबीजेच्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत मॉलमधील विविध आस्थापनांचे आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या गंभीर दुर्घटनेची तातडीने दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची सविस्तर पाहणी केली..
सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टाची अशी राखरांगोळी होणे हे अत्यंत वेदनादायी असून, नुकसानग्रस्त व्यावसायिकांना या संकटातून पुन्हा खंबीरपणे उभे करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मोठा धीर दिला.

या व्यावसायिकांना विम्याची मदत विनाविलंब मिळावी, यासाठी संबंधित विमा कंपन्यांनी आजच्या आज नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे पूर्ण करावेत, असे सक्त निर्देश उदय सामंत यांनी दिले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत आपण स्वतः व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बचावकार्य आणि संबंधित यंत्रणांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे चार ते पाच तास अथक परिश्रम घेत दहा ते पंधरा पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विमा कंपन्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देतानाच, या आगीची झळ बसलेल्या मॉललगतच्या आणखी एका दुकानाचेही स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दुर्घटनाग्रस्त मॉलची दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजनांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या तीन ते चार दिवसांत महालक्ष्मी मिनी मॉल पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा मानस उदय सामंत यांनी व्यक्त केला.

यासोबतच भविष्यात अशा स्वरूपाच्या दुर्घटना टाळण्यासाठी मॉलमधील अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आगीने दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान केले असले तरी व्यापाऱ्यांची जिद्द आणि आत्मविश्वास कमी होऊ नये, या कठीण प्रसंगी शासन आणि आपण स्वतः व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांचा व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply