खेड: महाबळेश्वर आणि कोकण परिसरातील दळणवळणाला तसेच पर्यटनाला मोठी गती देणारा महत्वाकांक्षी खेड-महाबळेश्वर केबल-स्टेड स्काय ब्रिज अंतिम टप्प्यात आला आहे.
कोयना नदीच्या विस्तीर्ण बॅकवॉटरवर बांधण्यात आलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर तयार करण्यात आला असून पावसाळ्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.
या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर जवळ येणार असून खेड ते महाबळेश्वर दरम्यानचे प्रवासाचे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे.
सध्या रत्नागिरी किंवा खेडवरून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरमार्गे अत्यंत अवघड अशा आंबेनळी घाटातून प्रवास करावा लागतो.
मात्र, हा नवीन पूल महाबळेश्वर जवळील तापोळा आणि खेडमधील गाढवली-आहीर परिसराला थेट जोडणार असल्यामुळे आंबेनळी घाटाचा वळणावळणाचा रस्ता बायपास होणार आहे. यामुळे पर्यटकांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल.
या पुलावर बांधण्यात येणाऱ्या उंच व्ह्यूइंग गॅलरीतून पर्यटकांना कोयना जलाशय आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचे विहंगम दृश्य अनुभवता येणार असल्याने महाबळेश्वर पर्यटनात मोलाची भर पडणार आहे.
या नवीन मार्गामुळे महाबळेश्वरशी जोडल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील २१ दुर्गम गावांचा संपर्क सुकर होणार आहे. पावसाळ्यात बोटीने धोकादायक प्रवास करणाऱ्या गावांना आता बारमाही रस्ता मिळणार असून यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावाचाही समावेश आहे.
या पुलामुळे महाबळेश्वर आणि तापोळा परिसरात जलक्रीडा, होमस्टे आणि इको-टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

