दापोली:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दापोली पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ‘प्लास्टिकमुक्त महास्वच्छता श्रमदान’ मोहीम उत्साहात राबवण्यात आली.

या मोहिमेद्वारे दापोली शहर आणि परिसर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना, घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

‘दापोली तालुका स्वच्छ व सुंदर करणे’ या व्यापक अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या उपक्रमांतर्गत दापोली शहरातून गिम्हवणे, जालगाव, टाळसूरे, खेर्डी, लाडघर आणि मौजे दापोली या गावांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या सुमारे पाच किलोमीटर परिसरात स्वच्छता करण्यात आली.

रस्त्यांच्या बाजूला टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.

या महास्वच्छता मोहिमेत पंचायत समिती सभापती उन्मेश राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, पंचायत समिती गटनेते नीलेश, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

तसेच विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था, संत निरंकारी मंडळ, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, जेसीआय आणि रोटरी क्लबचे सदस्यही मोठ्या संख्येने या श्रमदानात सामील झाले होते.