दापोली : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ‘नासा-इस्रो विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीत दापोली तालुक्यातील पाच विद्यार्थिनींनी यश मिळवून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभ्यास दौऱ्यासाठी आपली निवड निश्चित केली आहे.

हा अभ्यास दौरा १९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या यशाबद्दल पंचायत समिती दापोली येथे एका विशेष कार्यक्रमात या पाचही विद्यार्थिनी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून त्यांना दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

या अंतर्गत केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर परीक्षा घेऊन निवडक विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्रो या अवकाश संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते.

या संपूर्ण प्रक्रियेचा वैयक्तिक खर्च विद्यार्थ्यांना करावा लागत नाही; याचा सर्व खर्च जिल्हा परिषद करते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी दापोली तालुक्यातील चंद्रनगर शाळेची नीरजा मनोज वेदक, किन्हळ शाळेची दिक्षा दिनेश येसवारे, विरसई शाळेची अक्षरा राजेंद्र पाटील, नवशी शाळेची प्रांजल चंद्रकांत खळे आणि हर्णै शाळेची सृष्टी सुदर्शन कोठावळे या पाच विद्यार्थिनींची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

यावेळी बोलताना पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेकडून या विद्यार्थ्यांचा गौरव होत असला तरी, योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सेस फंडातून या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि लाभाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या सत्कार समारंभाला गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी वलेले, शिक्षक मनोज वेदक, विनय राणे, दीपक जाधव, प्रज्ञा देघरकर, सायली तांबे, महेंद्र खांबल आणि प्रदीप गमरे उपस्थित होते. इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे दापोलीतून विशेष कौतुक केले जात आहे.