रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

त्याअनुषंगाने रत्नागिरी शहरालगत मिऱ्या किनाऱ्यासमोरील समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या एका नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.

या नौकेवर ५ लाख रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

ही नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली असून, नौकेवरील LED लाइट्स आणि संबंधित उपकरणेही ताब्यात घेण्यात आली आहेत.


शुक्रवार, दि. २९ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी शिवराज अनंत चव्हाण आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (रत्नागिरी) यांच्या गस्ती पथकाने मिऱ्या किनाऱ्यासमोरील समुद्रात गस्त घालताना ही नौका आढळून आली.

नौकेचे स्थान 17°02’26.5″ N, 73°06’16.9″ E असून, ती किनाऱ्यापासून ८.७२ नॉटिकल मैल अंतरावर राज्याच्या जलक्षेत्रात उभी होती. तपासणीत नौकेवर अनधिकृतरित्या LED लाइट्स लावलेले असल्याचे उघड झाले.

ही नौका तबस्सम याहिया सोलकर (मु. २४३, मजगाव रोड, मराठी शाळेजवळ, कोकणनगर, रत्नागिरी) यांच्या मालकीची असून, नौकेचे नाव “अल-कासिम” (क्र. IND-MH-4-MM-6127) आहे.

नौकेवर तांडेलासह ३ खलाशी होते; मात्र, कोणतीही मासळी आढळून आली नाही. सध्या नौका जप्त करून मिरकरवाडा बंदरात नेण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (रत्नागिरी) सागर कुवेसकर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

अंमलबजावणी अधिकारी शिवराज चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (रत्नागिरी) आणि गस्ती नौका ‘रामभद्रा’वरील कर्मचारी ज्ञानेश्वर अजगोलकर, विशाल यादव, शिवकुमार सिंग यांनी यात सहकार्य केले.

संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायालयात होणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत या नौकेला ५ लाखांचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवरील अवैध मासेमारीला थारा नसल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.