शिरगाव (रत्नागिरी) : येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये १४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ योद्धे नसून एक आदर्श राजा आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आपल्या अफाट शौर्याने त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले होते आणि ‘बुधभूषण’ सारख्या ग्रंथाची निर्मिती करून आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली होती.

आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी १२० लढाया केल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत, हे त्यांच्या अद्वितीय युद्धकौशल्याचे प्रतीक आहे. धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यासाठी त्यांनी सोसलेले बलिदान आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांचे धैर्य, निडरपणा आणि निष्ठा आजही युवकांसाठी आदर्श मानली जाते.

या प्रसंगी प्राचार्य केतन चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर चौधरी यांनी त्यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.