रत्नागिरी : जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात (एसआयआर) प्रशासनाने मोठी प्रगती केली असली तरी, अद्याप काही मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.

प्रशासनातर्फे राबवण्यात आलेल्या गृहभेटी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, १३ लाख २९ हजार ४२ मतदारांपैकी तब्बल ११ लाख ९७ हजार ४४६ मतदारांचे डिजिटायझेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, काही कारणास्तव किंवा वेळेअभावी १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांचे अर्ज पुन्हा जमा होऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची तांत्रिक शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ४३ हजार ५६९, दापोलीतील २५ हजार ६४३, गुहागरमधील १९ हजार ८८९, चिपळूणमधील २५ हजार ३८६ आणि राजापूर मतदारसंघातील १७ हजार १०९ मतदारांचा समावेश आहे. मतदानाचा हक्क हा लोकशाहीतील आपला सर्वात मोठा आणि अमूल्य अधिकार आहे, त्यामुळे कोणाचाही हा हक्क हिरावला जाऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. निवडणूक विभागाने मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी नवीन वेळापत्रक आखले आहे. ज्या नागरिकांची नावे चुकून वगळली गेली आहेत किंवा जे नवीन मतदार आहेत, त्यांनी निराश न होता आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या Voter Service Portal या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या अधिकृत पोर्टलवर नागरिकांना नोंदणीसाठी आवश्यक असणारे योग्य अर्ज, अद्ययावित तारखा आणि संपूर्ण प्रक्रियेची अचूक माहिती सहज उपलब्ध होईल. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.