दापोली  :  माय कोकणनं दोन दिवासांपूर्वी दापोली बाजारपेठेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला अशी बातमी दिली होती. या बातमीनं खूपच खळबळ माजली होती. अनेकांनी बाजारपेठेतील कोण आहे याचा शोध सुरू केला. आम्हालाही प्रेक्षकांचे आणि वाचकांचे फोन येऊ लागेल. ती माहिती आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामधून अधिकृतरित्या मिळाल्याचं आम्ही सांगितलं. त्या रूग्णाचं गाव जरी दाभोळ असलं आणि आम्हाला जरी त्याची माहिती असली तरी जी अधिकृत माहिती आम्हाला प्राप्त झाली होती, ती आम्ही प्रेक्षकांना दिली. कोरोनाच्या या संकटात आम्ही प्रेक्षकांना अधिकृत आणि खरी बातमी देण्याचं ठरवलं आहे. बातमी द्यायला थोडा उशीर झाला तरी चालेल. पण आमच्या वाचकांपर्यंत पक्की माहिती पोहोचली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो.

त्या रूग्णाबाबत आम्ही मग माहिती घ्यायला सुरूवात केली. नक्की बाजारपेठेत तो कुठे राहतो. नक्की काय प्रकार आहे? त्यानं दापोली बाजारपेठेचा पत्ता का दिला आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांच्याशी संपर्क साधला. डॉ. बिरादार यांनी सांगितलं की,

“ती व्यक्ती मस्कतवरून मुंबईला आली आणि मुंबईवरून त्यांनं थेट रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. तो रूग्ण दापोली किंवा दाभोळमध्ये आलेला नाही. तो मुळचा दाभोळचा आहे पण त्याची बहीण दापोलीत राहत असल्यामुळे त्यानं दापोली बाजारपेठेचा पत्ता दिला होता. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही”

डॉ. शिवा बिरादार नेमकं काय म्हणालेत हे तुम्ही खालील व्हिडिओमध्ये ऐकू शकता.

 

‘माय कोकण’नं कायम सत्य आणि अचूक बातमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रेक्षक आणि आमचे वाचक यानी या काळात  आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. माय कोकणच्या माध्यामातून माहिती तुम्हाला सातत्यानं देण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहणार आहोत.