रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

ग्रामस्थांशी थेट संवाद आणि गावचा इतिहास जपण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात ‘आपुलकीचा मुक्काम’

ग्रामस्थांशी थेट संवाद आणि गावचा इतिहास जपण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात ‘आपुलकीचा मुक्काम’

दापोली: मतदारसंघातील गावांचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी थेट जाणून घेण्याच्या उद्देशाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुरू केलेल्या ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील गुडघे गावात मुक्काम केला.

महिन्यातून एक दिवस एका गावात वास्तव्य करून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्याशी थेट संवाद साधणे आणि आरोग्य व नळपाणी योजनेसारखे मूलभूत प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच सोडवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

निवेदनांपलीकडे जाऊन गावाचे जीवनमान जवळून अनुभवणे आणि प्रत्येक गावाचा समृद्ध इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे, या ध्येयाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे योगेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

नोव्हेंबर महिन्याच्या मुक्कामासाठी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे मूळ गाव असलेल्या गुडघे गावाची निवड करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी दिंडीने योगेश कदम यांचे स्वागत केले.

यावेळी कदम यांनीही डोक्यावर वारकरी टोपी घालून आणि हातात टाळ घेत दिंडीत सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनी शेतकरी व बागायतदार मिलिंद दांडेकर यांच्या ८० वर्षांपूर्वीच्या कौलारू मातीच्या घरात मुक्काम केला.

शेणाने सारवलेल्या माजघरात जमिनीवर बसून केळीच्या पानावर चुलीवरच्या आमटी-भाताचा आस्वाद घेत त्यांनी साधेपणाने ग्रामस्थांशी जवळीक साधली.

घरासमोरील अंगणात आयोजित खळा बैठकीत योगेश कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावाचा लिखित इतिहास आणि समस्या जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले आणि चैतन्य दांडेकर यांनी गोवळकोट किल्ला, दाभोळचे व्यापारी केंद्र आणि साखळदंडाचा वापर करून लुटारूंना रोखणाऱ्या दांडेकरांच्या गनिमी काव्याची ऐतिहासिक माहिती दिली.

तसेच, राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र दांडेकर, साहित्यिक गो. नी. दांडेकर, लेखिका वीणा देव आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा या गावाशी असलेला संबंध उलगडून दाखवला.

कैवल्य दांडेकर यांनी संगणकावर गावाचा गुगल मॅप सादर करत परिसरातील जलस्रोत, जैवविविधता आणि कर्करोगावर उपयुक्त ठरणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित केले.

ही माहिती ऐकून अशा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास असलेल्या गावांची अधिकृत नोंद ठेवण्याच्या सूचना योगेश कदम यांनी प्रशासनाला दिल्या.

डोंगरदऱ्या चढून येताना गुडघे दुखत असल्याने या गावाला ‘गुडघे’ हे नाव पडल्याचे अनंत करबेले यांनी सांगितले. १९८८-८९ पर्यंत वीज आणि रस्ते नसलेल्या या खाडीपट्ट्यातील गावांच्या विकासाला माजी मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार तू. बा. कदम यांच्या काळात गती मिळाल्याची आठवण ज्येष्ठ ग्रामस्थांनी करून दिली.

या मुक्कामादरम्यान गावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर कदम, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी हिरेमठ, पंचायत समिती सभापती उन्मेश राजे, निलेश शेठ, ममता शिंदे, नरेश घरटकर, दिप्ती निखार्गे यांच्यासह महसूल व पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Apulkicha Mukkam, dapoli news, Go Ni Dandekar, Gudghe Village, konkan news, Maharashtra Politics, marathi news, ratnagiri news, Village Development, yogesh kadam

Updated: 29 Nov 2026 8:23 AM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *