चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूणमध्ये मोठी कारवाई केली आहे.
पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची ५.५३२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पिंपळी खुर्द येथे बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास पथकाने चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल सॉ मिलच्या आवारात एनडीपीएस कायद्यांतर्गत छापा टाकला.
यावेळी मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, पो. कुचेटा, ता. मिल्कीपूर, पो. ठाणे इनायतनगर, जि. अयोध्या, उत्तर प्रदेश) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड व जोपासना करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष एकूण ५.५३२ किलो वजनाची व १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश होता.

Leave a Reply