रत्नागिरी : शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या भारतीयांना मायदेशातील सणाचा आनंद घेता यावा आणि त्यांना घरच्या फराळाची चव अनुभवता यावी, यासाठी रत्नागिरी डाक विभागाने सुरू केलेल्या विशेष दिवाळी फराळ पार्सल सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
टपाल विभागाने ऑक्टोबर महिन्यापासून ही विशेष सेवा सुरू केली होती. नागरिकांना ही सेवा अधिक सुलभ व्हावी यासाठी पार्सल पिकअपची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, तसेच पार्सल बुकिंगपासून ते परदेशात रवाना होईपर्यंत प्रत्येक प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
या नियोजनबद्ध उपक्रमांतर्गत १२ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी डाक विभागामार्फत एकूण १५९ आंतरराष्ट्रीय फराळ पार्सलचे बुकिंग करण्यात आले असून, जगातील २८ देशांमध्ये ही पार्सल यशस्वीरीत्या रवाना झाली आहेत.
या माध्यमातून तब्बल एक हजार किलोहून अधिक वजनाचा फराळ परदेशात पोहोचविण्यात आला असून प्रत्येक पार्सलचे सरासरी वजन पाच किलो होते.
या उपक्रमाला विशेषतः रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतून लक्षणीय प्रतिसाद मिळाला. प्राप्त आकडेवारीनुसार, सर्वाधिक ५५ फराळ पार्सल अमेरिकेत पाठविण्यात आले आहेत.
त्याखालोखाल युनायटेड किंगडममध्ये २०, संयुक्त अरब अमिराती आणि जर्मनीमध्ये प्रत्येकी १२, तर रशिया आणि कॅनडामध्ये प्रत्येकी १० पार्सल पाठविण्यात आले आहेत.
डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन आणि नागरिकांचा उत्साह यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे. नागरिकांचा हा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी डाक विभाग प्रयत्नशील राहील, तरी नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply