शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची मुंबईत सुटका; तरुणाला पोलिसांकडून अटक

सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची मुंबईत सुटका; तरुणाला पोलिसांकडून अटक

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथून ९ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत मुंबईतून या मुलीची सुटका केली असून, तिच्यासोबत असलेल्या संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सावर्डे परिसरात मोठा तणाव आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच पावले उचलत प्रकरणाचा यशस्वी छडा लावला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रत्नागिरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने सावर्डे येथे घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात त्वरित क्यू. आर. टी. (QRT) पथके तैनात करण्यात आली. यानंतर खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक आबासो पाटील, चिपळूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली.

या पथकांनी विविध ठिकाणी कसून शोधमोहीम राबवली आणि अखेर १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत संशयित तरुण आणि पीडित अल्पवयीन मुलीला शोधून काढले.

सध्या पीडित मुलीला महिला पोलिसांच्या सुरक्षित देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, ताब्यात घेतलेल्या तरुणावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, चालक हवालदार अतुल कांबळे, हवालदार दीपराज पाटील, गणेश सावंत आणि सहायक फौजदार पांडुरंग गोटे यांच्या पथकाने पार पाडली.

BNS 2023, Chiplun News, Crime News Maharashtra, local crime branch, maharashtra police, Missing Girl Rescued, ratnagiri police, Savarde Kidnapping Case

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *