चिपळूण : तालुक्यातील आगवे येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका मोटार आणि स्पेअर पार्टच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल एक लाख चार हजार नऊ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव प्रभाकर डोगरे यांच्या मालकीचे आगवे येथील पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या बाजूला साई मोटार अँड स्पेअर पार्ट नावाचे दुकान आणि गॅरेज आहे.
सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता त्यांनी आपले नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात हत्याराने उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दुकानाची पाहणी केली असता चोरट्यांनी आत प्रवेश करून विक्रीसाठी आणलेले महागडे सुटे भाग आणि गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी दुकानातून व्हॉल्वोलाईन कंपनीचे ऑईल बकेट, ऑईल कॅन, बॉल जॉईंट सेट, बोलेरो टाय रॉड एंड सेट, टेम्पो ट्रॅव्हलर क्लच सेट, ब्रेक बुस्टर, ब्रेक रोटर आणि ब्रेक लायनिंग सेट असा वाहनांचा मोठा ऐवज चोरून नेला आहे.
याशिवाय दुकानातील तीन हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली आहे. यामध्ये पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश होता.
या चोरीप्रकरणी वैभव डोगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावर्डे पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
महामार्गालगतच ही धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

