दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत डॉ. विजय विठ्ठल आवारे यांना नुकतेच राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसाठी प्रत्येकी एक असा हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन, अध्यापन, विद्यार्थी मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार या योगदानाची दखल घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठीचा हा मानाचा पुरस्कार डॉ. आवारे यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. आवारे हे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कृषी आणि संबंधित क्षेत्रांतील श्रमविज्ञान आणि सुरक्षितता योजनेचे प्रमुख अन्वेषक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

त्यांनी कृषी यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी या विषयात आचार्य पदवी पूर्ण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले असून या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला आविष्कार आणि डीपेक्स सारख्या स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत.

डॉ. आवारे यांनी शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारी आणि स्त्री-पुरुष दोघांनाही सहज वापरता येणारी सात कृषी अवजारे व यंत्रसामग्री विकसित केली आहेत.

यामध्ये हस्तचलित व बॅटरीचलित कोकण प्रसन्न भात लावणी यंत्र, नाचणी मळणी व सडणी यंत्र, सुपारी सोलणी यंत्र आणि सुधारित वैभव विळा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

ही यंत्रे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. याशिवाय त्यांनी यंत्रविक्री व यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी परिभ्रमण निधी सुरू करून विद्यापीठाच्या महसुलातही मोलाची भर घातली आहे.

त्यांच्या नावावर चार तंत्रज्ञान व यंत्रे डिझाईन नोंदणी असून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ६१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी चार पुस्तकांचे लेखन केले असून बाह्यसंस्थांमार्फत अर्थसहाय्यित सहा संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.

तंत्रज्ञान प्रसारात त्यांचा मोठा सहभाग राहिला असून यापूर्वीही त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधन केंद्राला २०२५ मध्ये उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

विद्यापीठातील सेवेमुळेच विद्यार्थ्यांना शिकवणे, शेतकऱ्यांसाठी अवजारे विकसित करणे व त्यांचा प्रसार करणे या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाल्याचे डॉ. आवारे यांनी नमूद केले.

कुलगुरू, सर्व संबंधित अधिकारी वर्ग आणि नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहानामुळेच शेतकऱ्यांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करता आले आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार २०२६ प्राप्त झाला, अशी भावना डॉ. आवारे यांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, सहकारी संशोधक आणि शेतकरी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.