रत्नागिरी : येथे १० व ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

या सुवर्णवेधामुळे लांजाच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, या दोन्ही खेळाडूंची १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर विभागात होणाऱ्या शालेय तायक्वॉंदो विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता विभागीय स्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या दोन्ही खेळाडूंना मिळणार आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती राजापूर संचलित राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि तायक्वॉंदो अकॅडमी राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत लांजा तालुक्यातून एकूण ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत असलेला दिपराज खानविलकर आणि डी. जे. सामंत स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेली तीर्था यादव यांनी तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील राष्ट्रीय पंच शितल विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडली.

या घवघवीत यशाबद्दल तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा, गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी लांजा आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सचिव व राष्ट्रीय पंच तथा प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, लक्ष्मण करारा, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच तेजस पावसकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर आणि स्वरूप शिंदे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व लांजावासीयांनी दिपराज खानविलकर व तीर्था यादव यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.