राजापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरीच्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, राजापूर तालुका शारीरिक शिक्षण संघटना तसेच राजापूर तालुका तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील विविध विद्यालयांच्या खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. युवा मार्शल आर्टच्या खेळाडूंनी आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ८ पदके पटकावली. या दमदार कामगिरीच्या बळावर रत्नागिरी तालुक्याला द्वितीय क्रमांकाचे मानाचे यश प्राप्त झाले.
स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांमध्ये आयान मुश्ताक खान, उपर्जना राम कररा, अमेय भरत पाटील, सई संदेश सुवारे आणि भार्गवी सत्यविजय पवार यांनी चमकदार कामगिरी केली, तर दिव्या विलास गुरव, उमर अलजी व कौस्तुभ वालम यांनीही आपल्या खेळाची छाप सोडली. या संघाला शशी रेखा कररा यांचे महिला प्रशिक्षक म्हणून आणि राम कररा यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडूंची आगामी तळसंदे, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंच्या यशाबद्दल रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा अधिकारी गणेश जगताप आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वर राव कररा यांनी सर्व विजेत्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

