रत्नागिरी: शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये १७ सप्टेंबर २०२६ रोजी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
मराठी पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते, इतिहासकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता.
त्यांनी आपल्या सात दशकांच्या सामाजिक, वैचारिक आणि राजकीय जीवनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारत बालविवाह, अस्पृश्यता, हुंडा प्रथा आणि देवळांमधील पुरोहितशाही यांच्याविरुद्ध लढा दिला होता.

प्रबोधन नावाच्या नियतकालिकामुळे त्यांना प्रबोधनकार हे टोपणनाव मिळाले होते, ज्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. या जयंती सोहळ्यात प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
याच कार्यक्रमादरम्यान मत्स्य विद्या शाखेतील माजी सहयोगी अधिष्ठाता प्रकाश राजे आणि दिलीप जालीहाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचे स्मरण करून त्यांना वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

