दापोली : पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत जेसीआय दापोलीने सस्टेनेबल सोल्युशन्स प्रकल्पांतर्गत स्वीकारलेल्या प्लास्टिक फ्री दापोली या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली एस.टी. बसस्थानक तसेच बाजारपेठ परिसरातील फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि अन्य छोट्या उद्योजकांना तब्बल १८०० हून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता यांनी जानेवारी २०२६ मध्ये पदग्रहण सोहळ्याच्या दिवशी वर्षभरासाठी प्लास्टिक फ्री दापोली ही संकल्पना जाहीर केली होती, त्यानुसार वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.

या अभियानातील पहिल्या उपक्रमांतर्गत दापोली पोस्ट ऑफिस, एमएसईबी कार्यालय, विविध ऑटोरिक्षा चालक तसेच नुकतेच दातार वृद्धाश्रम या ठिकाणी १५० हून अधिक स्टील बॉटल्सचे वाटप करण्यात आले होते, ज्याचा उद्देश प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टीलची बाटली हा पर्यावरणपूरक पर्याय नागरंपर्यंत पोहोचवणे हा होता.

याचबरोबर मागील सात-आठ महिन्यांत जेसीआय दापोलीने विविध स्वच्छता अभियानांमध्येही सक्रिय सहभाग घेतला असून, पंचायत समिती दापोलीच्या सहकार्याने राबविलेल्या स्वच्छता मोहिमांसह दापोलीतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर बीच क्लीनिंग अॅक्टिव्हिटी राबवून संस्थेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, आणि या उपक्रमांची दखल घेत जेसीआय इंडियाच्या झोन ११ कडूनही जेसीआय दापोलीच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत खरेदी-विक्री वाढल्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, याच पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कापडी पिशव्यांचे हे व्यापक वितरण करण्यात आले असून, प्लास्टिकला नकार आणि कापडी पिशवीचा स्वीकार हा संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक तसेच सदस्य कुणाल मंडलीक, भूषण इस्वलकर, तेजस मेहता, ऋषिकेश शेठ, मयुरेश शेठ, प्रसाद दाभोळे, अद्नान मुकादम, रोहन आंब्रे, ऋषिकेश तलाठी आणि विनय शिगवण उपस्थित होते.

जेसीआय दापोलीच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिक, छोटे व्यावसायिक आणि विविध स्तरांतून कौतुक होत असून, प्लास्टिक फ्री दापोलीच्या दिशेने संस्थेचा हा उपक्रम जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष बदल घडवून आणणारा ठरत आहे.