रत्नागिरी : शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप आणि रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो-रिक्षा भाडे दरपत्रकाचे फलक लावून प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे व सौजन्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, केवळ दोनशे रुपयांचे फलक लावून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. रिक्षाचालक नियमांची पायमल्ली करत मीटरप्रमाणे भाडे न आकारता प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करत असून विरोध केल्यास अरेरावी करत आहेत.
विशेषतः रेल्वे स्टेशन हा भाग शहराबाहेर असल्याचे कारण पुढे करत नियम लागू होत नसल्याचे सांगत हात वर केले जातात. रेल्वे स्टेशन पासून मुख्य रस्त्यापर्यंत जायचं असेल तरी ते पन्नास रुपये घेतात. आणि जर कोणी विरोध केला तर वरील कारण सांगतात मीटर बिटर कायदा बियदा काय नाय?
प्रशासनाकडून केवळ सणासुदीच्या काळात औपचारिकता म्हणून मोहीम राबवली जात असून प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यालयाचा संपर्क क्रमांक किंवा नोडल ऑफिसरचा नंबर फलकावर उपलब्ध करून दिला जात नाही. यावेळेला संपर्क देण्यात आला आहे. पण तरी रिक्षा व्यावसायिक जुमानत नाही.
तक्रार संपर्क क्रमांक : 7588760808

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व प्रवासाची पर्यायी सोय नसल्याने प्रवाशांना नाइजालास्तव जादा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ फलकबाजी न करता आरटीओ प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ठोस कारवाई करावी आणि रिक्षाचालकांची मनमानी रोखावी, अशी संतप्त मागणी रत्नागिरीतील प्रवाशांकडून होत आहे. सणासुदीच्या काळामध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक कर्मचारी असणं जनहिताचं ठरेल. पण ही अपेक्षा थोडी जादाची आहे असं गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून दिसत आहे.
काल रात्री आमचे प्रतिनिधी रिक्षा साडेत पोहोचले होते आणि त्यांनी रिक्षावाल्याला विचारलं की मीटर प्रमाणे जाणार का? रिक्षा चालकाने ऑडिओ घेतले आणि बाजूला सरकला. शेर रिक्षावाल्याची पण तीच परिस्थिती होती. सरसकट ते 50 रुपये मागतात. आरटीओ रेट कार्डचा त्यांच्यावर कोणताही परिणाम जाणवत नाही.
या विषयावर आरटीओ कार्यालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, एखाद्या प्रवाशाला जर वाईट अनुभव आला किंवा कोणताही रिक्षा चालक जर मीटर प्रमाणे किंवा ठरवलेल्या दराप्रमाणे जात नसेल तर संबंधित प्रवाशांनी त्यांची तक्रार करावी असं म्हटलं आहे.

