रत्नागिरी: गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, आपुलकी आणि सेवाभावाचा उत्सव व्हावा, या भावनेतून रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक १५ मध्ये गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना गणेशोत्सव किटचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगर परिषद नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम ढेकणे यांच्या पुढाकारातून संपूर्ण प्रभागातील नागरिकांना हे किट वितरित करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या उत्साहात सहभागी होत त्यांच्या आनंदात आपला आनंद मानण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न या दाम्पत्याकडून सातत्याने केला जात असून, त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या उपक्रताचे आयोजन करण्यात आले होते.
गणरायाच्या आगमनाचा आनंद प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशातून हे किट वाटप करण्यात आल्याचे वर्षा ढेकणे यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ढेकणे दाम्पत्याचे आभार मानले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामेच नव्हे, तर नागरिकांच्या सण-उत्सवात सहभागी होण्याची ही भूमिका सध्या नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत असून या माध्यमातून प्रभाग १५ मध्ये सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि आपुलकीचा संदेश पोहोचला आहे.

