दापोली : प्रशासकीय मंजुरी आणि निधी कधी मिळणार यावर भिस्त न ठेवता ‘आपलं गाव, आपणच घडवायचं’ या मंत्राचा अवलंब करत दापोली तालुक्यातील बोरिवली आडीवाडी येथील ग्रामस्थांनी संपूर्ण कोकणासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

गावातील मुख्य रस्त्यांची सफाई असो की वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडी, शासकीय मदतीची अजिबात वाट न पाहता संपूर्ण गावाने एकत्र येत स्वखर्चाने आणि महाश्रमदानातून संपूर्ण परिसराचा कायापालट करून दाखवला आहे.

बोरिवली आडीवाडी ते पंचनदी आणि बोरिवली आडीवाडी ते चिखलगाव या दोन्ही प्रमुख मार्गांवर ही धडक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार वाढलेली झुडपे, एसटी बस व इतर वाहनांना घासणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि थेट वीज वाहिन्यांवर लटकणारे मोठे अडथळे हटवून रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले.

या कामासाठी कटर मशीन्स, छाटणीची अवजारे आणि इंधनाचा सर्व खर्च ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून केला असून यामध्ये शासकीय निधीचा किंवा मदतीचा एक रुपयाचाही भार घेण्यात आला नाही.

कोणतीही एका दिवसाची स्टंटबाजी नसून, दरवर्षी न चुकता सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आपले प्रश्न स्वतःच सोडवण्याची परंपरा बोरिवलीत कायम राखली जात आहे. केवळ प्रशासनावर खापर फोडणाऱ्या आजच्या काळात, प्रत्यक्ष कृतीतून गावचा विकास कसा साधायचा, हे दाखवून देणाऱ्या या आत्मनिर्भर पॅटर्नबद्दल आणि ग्रामस्थांच्या एकजुटीबद्दल दापोली तालुक्यातून कौतुक केले जात असून या संपूर्ण उपक्रमाची बातमी सागर गोवळे यांनी संकलित केली आहे.