दापोली : दापोली नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी महेश धुमाळ यांची माजी नगराध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेविका ममता बिपिन मोरे आणि नगरसेवक संदीप चव्हाण यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर या वेळी सकारात्मक विचारविनिमय झाला.

तसेच, शहर विकासाला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक वाढविण्यावरही भर देण्यात आला.

नवनियुक्त मुख्याधिकारी महेश धुमाळ यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, शहराच्या विकासासाठी प्रशासनाने लोकाभिमुख भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केली.

यावेळी साई मोरे आणि इम्रान चिपळूणकर देखील उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीमुळे येत्या काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल आणि दापोलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.