दापोली : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील जन आरोग्य समितीच्या रचनेत आता पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत शासनाने नवीन शासन निर्णय काढला असून, जालगाव गणाचे पंचायत समिती सदस्य श्रीराम भिकू इदाते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे.

शासनाने २३ नोव्हेंबर २०२२ रोजी काढलेल्या निर्णयानुसार जन आरोग्य समितीच्या रचनेत पंचायत समिती सदस्यांना स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

आपल्या गणातील आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवणे, शासनाचे विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबवणे आणि वेगवेगळ्या आजारांबाबत जनजागृती करण्यात पंचायत समिती सदस्य नेहमीच आघाडीवर असतात. असे असतानाही त्यांना या महत्त्वाच्या समितीतून डावलण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

या पार्श्वभूमीवर श्रीराम इदाते यांनी थेट आयुष्मान भारत मिशनच्या महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्याशी पत्रव्यवहार करून पंचायत समिती सदस्यांना जन आरोग्य समितीत सामावून घेण्याची मागणी केली होती.

शासनाने आणि प्रशासनाने या पत्राची तातडीने दखल घेतली आहे. शासनाने आता पंचायत समिती सदस्यांना जन आरोग्य समितीत अधिकृत स्थान देण्याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आरोग्य योजना तळागाळात पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.