रत्नागिरी: जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला आज एक मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत (वय ५५) यांचे आज रात्री ९ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी निधन झाले.
कोल्हापूरहून आपल्या कर्मभूमीकडे, रत्नागिरीत परतत असतानाच वाटेत त्यांनी कायमचा निरोप घेतला. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने नातेवाईकांवर आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजेश सावंत हे केवळ राजकारणी नव्हते, तर रत्नागिरीच्या मातीतला एक उत्तम क्रिकेटपटू आणि सच्चा क्रीडाप्रेमी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या सोबतीने आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. रत्नागिरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने जनतेची सेवा केली.
त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बांधणीचे कसब पाहून भाजपने त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी विश्वासाने सोपवली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. राजकारणात असूनही त्यांनी नेहमीच सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले.
नुकत्याच झालेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबात एक वेगळाच राजकीय प्रसंग उद्भवला होता. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने यांच्या सून आणि स्वतः राजेश सावंत यांच्या कन्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.
राजकीय आणि कौटुंबिक नात्यात कोणताही दुरावा किंवा संघर्ष निर्माण होऊ नये, तसेच पक्षाची प्रतिमा जपली जावी, या उदात्त आणि अत्यंत संवेदनशील हेतूने राजेश सावंत यांनी स्वतःहून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
राजकारणापेक्षा त्यांनी नेहमीच मूल्यांना आणि नात्यांना अधिक महत्त्व दिले.
नियतीच्या या क्रूर खेळामुळे आज एका चांगल्या नेत्याला आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाला रत्नागिरी कायमची मुकली आहे.
सध्या त्यांचे पार्थिव पाली येथील रुग्णालयात ठेवण्यात आले असून, तेथून लवकरच रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात आणले जाणार आहे.
या दुःखद बातमीने रत्नागिरीतील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक जण अत्यंत भावूक झाला असून हळहळ व्यक्त करत आहे.
उद्या त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एका मनमिळावू नेतृत्वाची अशा प्रकारे झालेली एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली आहे.

