रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ‘आपले सरकार पोर्टल’च्या माध्यमातून नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शासनाकडून विविध विभागांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले जाते, ज्यामध्ये जून २०२६ आणि जुलै २०२६ या सलग दोन महिन्यांत रत्नागिरी पोलिसांनी राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दलांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जून २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी एकूण १,७२३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,६१० अर्जांचा वेळेत निपटारा करण्यात आला.

या कामगिरीमुळे ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’ म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात पहिला क्रमांक मिळवला असून, ‘सर्व्हिस विथ हायेस्ट सिटीझन स्कोर’मध्येही दल राज्यात प्रथम राहिले.

या कालावधीत करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलिसांनी टायमिंगनेस स्कोरमध्ये १५.३२ आणि सिटीझन स्कोरमध्ये १०.७२ गुण मिळवले. हीच उत्कृष्ट कामगिरी जुलै २०२६ मध्येही कायम राखण्यात आली.

जुलै महिन्यात पोलीस दलाकडे १,८०७ अर्ज आले होते, ज्यातील १,७१२ अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. जुलै महिन्याच्या मूल्यमापनातही ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस आणि सर्व्हिस विथ हायेस्ट सिटीझन स्कोर या दोन्ही श्रेणींमध्ये अव्वल स्थान राखत रत्नागिरी पोलिसांनी टायमिंगनेस स्कोरमध्ये ५०.६४ आणि सिटीझन स्कोरमध्ये ३५.६६ इतक्या गुणांची कमाई केली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या उद्देशाने ही कामगिरी बजावली असून, भविष्यातही अधिक जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी दल प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.