रत्नागिरी: हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त ७ ऑगस्ट हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट २०२६ रोजी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेले मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव, आसमंत फाउंडेशन पुणे आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने “ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य केतन चौधरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी आसिफ पागरकर, मनोज घुघुसकर आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी एम. एस. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
या प्रशिक्षण कार्यक्रमास शिरगाव पंचक्रोशीतील महिला, जलजीविकाचे प्रकल्प व्यवस्थापक, इनरव्हील क्लबचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य केतन चौधरी यांनी शाश्वत शेतीसाठी सातत्याने संशोधन होणे आणि पर्यावरणाचा विकास साधणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
जैविक कचऱ्याचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास रोगराई पसरू शकते, यावर मात करण्यासाठी मनोज घुघुसकर यांनी काळी सैनिकी माशी अर्थात ब्लॅक सोल्जर फ्लायवर केलेले संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या तंत्रज्ञानामुळे जैविक कचऱ्याचे विघटन होऊन त्यातून शाश्वत मत्स्यशेती व कुक्कुटपालनासाठी उत्तम खाद्य उपलब्ध होते, तर तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर शेतीसाठी उत्तम प्रकारे करता येतो.

काळी सैनिकी माशी ही एक स्थानिक व निसर्गाला पूरक असणारी माशी आहे. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मनोज घुघुसकर यांनी या माशीच्या संवर्धनाचे तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.
यामध्ये दैनंदिन ओला कचरा, सेंद्रिय पदार्थ आणि शेतातील जैविक कचऱ्याचे या माशीच्या साहाय्याने अत्यंत जलद गतीने विघटन केले जाते.
ही पद्धत गांडूळ खतापेक्षा अधिक वेगाने खत तयार करते, त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी जगभरात याचा जैविक पर्याय म्हणून वापर केला जात आहे.
या माशीच्या अळ्यांचा वापर पशु आणि पक्ष्यांसाठी उच्च दर्जाचे खाद्य म्हणूनही केला जातो. प्रशिक्षणादरम्यान मनोज घुघुसकर यांनी उपस्थितांना हे तंत्रज्ञान अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
त्यानंतर इनरव्हीलच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या प्राध्यापक वृंदाने विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक तोरणे, संशोधन संचालक प्रशांत शहारे, शिक्षण संचालक सतीश नारखेडे आणि कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता वरवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

