६ ऑगस्ट २०२१. हा तोच दिवस जेव्हा एका दीर्घ आजाराशी लढताना आमच्या बाबांची (अब्बा) झुंज अपयशी ठरली. मुस्तफा खान…आमच्या कुटुंबाचा भक्कम आधार. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून न येणारी आहे.

बाबा (अब्बा) पाठीशी असताना आम्हाला कधीच कसली भीती वाटली नाही. कोणतंच दडपण आलं नाही, कारण आम्ही सगळे अगदी बिनधास्त असायचो. कष्ट, जिद्द आणि प्रचंड हिंमत हे त्यांच्या जगण्याचं सूत्र होतं. “आपली चूक असेल तर शांत बसायचं, पण जर आपण बरोबर असू, तर कुणालाही घाबरायचं नाही,” असं ते आम्हाला कायम सांगायचे.

ते स्वतः कमी शिकले होते, पण मुलांनी भरपूर शिकलं पाहिजे हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. मधल्या काळात घरची परिस्थिती खूप खडतर होती. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आमच्यापैकी कुणाचेही शिक्षण थांबू दिले नाही.

त्यांच्या याच जिद्दीमुळे आज आमच्या घरात दोन पीएचडी, इंजिनीअर, पोस्ट ग्रॅज्युएट आणि वकिलांची भरमार आहे.
स्वभावाने ते आतून अतिशय हळवे, पण बाहेरून प्रचंड कणखर आणि धडाकेबाज होते.

शेवटच्या काळात आजारपणामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्या, खूप त्रास सहन करावा लागला. पण त्या दिवसांतही त्यांनी कधी चिडचिड केली नाही.

घरात लहान मुले खूप होती. त्यांचा सतत गोंगाट असायचा, पण “मला तुमच्या मस्तीचा त्रास होतोय” असं ते कधीच बोलले नाहीत. त्यांच्यात खरोखरच प्रचंड हिंमत होती.

आपला निरोप घेण्याच्या दोन-तीन दिवस आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की, “मला माझ्या सर्व मित्रपरिवाराला जेवण द्यायचं आहे.” आम्ही सर्व तयारी केली, सगळे लोक आले. प्रचंड आजारी असतानाही त्यांनी प्रत्येकाला मनसोक्त जेऊ घातलं आणि प्रत्येकाकडे जातीने लक्ष दिलं.

बाबांना नेहमी आपल्या खिशात काहीतरी पैसे (कॅश) ठेवण्याची सवय होती. खिशात पैसे नसले की ते बेचैन व्हायचे. पण जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी खिशातील सगळे पैसे बाहेर काढले आणि शांतपणे आईच्या हातात दिले. हे पाहणं आम्हासर्वांसाठी खूप क्लेशदायक होतं. कदाचित आपला शेवटचा प्रवास सुरू झाला आहे, याची त्यांना जाणीव झाली असावी.

त्यांना नेमका कोणता आजार झालाय, हे आम्ही त्यांच्यापासून शेवटपर्यंत लपवून ठेवलं होतं. पण त्यांना सांगायला तर हवं. आमची कोणाचीच हिंमत होईना, म्हणून आम्ही डॉक्टरांना घरी बोलावून त्यांना सत्य सांगण्याची विनंती केली.

जेव्हा डॉक्टरांनी त्यांना आजाराविषयी सांगितलं, तेव्हा त्यांनी कोणतीही तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. ते अजिबात डगमगले नाहीत, फक्त शांतपणे म्हणाले, “अच्छा!”.

पांढरे केस, पांढरी दाढी असलेला आमचा हा हक्काचा माणूस आम्ही गमावला आहे. त्यांच्या हिमतीला जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे. आज ते आमच्यात नसले, तरी त्यांची शिकवण आम्हाला आयुष्यभर पुरेल, हे नक्की.

-मुश्ताक खान