दापोली : तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा ‘व्हिजन दापोली’ हा उपक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेला जाणार आहे.
यामध्ये आधुनिक शेती, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे नवे उपक्रम समाविष्ट केले जाणार असून, या उपक्रमासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी दिली.
दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन दापोली मुख्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीच्या प्रारंभी व्हिजन दापोलीचे सचिव सुनील कारखेले यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे २०१७-१८ पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा विस्तृत आढावा घेतला.

यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा व गुणवत्ता उंचावणे, पालकांचा शाळांवरील विश्वास दृढ करणे, पालक प्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात आलेल्या सात मुख्य उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
यावर बोलताना सभापती उन्मेष राजे यांनी स्पष्ट केले की, व्हिजन दापोली हा उपक्रम आता अधिक प्रभावीपणे राबविला जाईल. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच कृषीविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत वर्षभर सेंद्रिय पालेभाज्यांची लागवड, शेतीविषयक प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पंचायत समिती सदस्य तथा गटनेते निलेश शेठ यांनी या बैठकीत बोलताना शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने नव्या जोमाने कार्य करण्याची गरज असून, या शैक्षणिक कार्यात समाजातील सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले, तर व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट यांनी सर्वांचे आभार मानले.
या बैठकीला उपसभापती नम्रता तोडणकर, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, संदीप चिखले, सुचिता महाडिक, सुवर्णा खळे यांच्यासह शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि व्हिजन दापोली समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच जीवनकौशल्य, कृषी, पर्यावरण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संगम घडविणारा हा उपक्रम आता ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी विकास मॉडेल ठरेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

