दापोली:  शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ऐतिहासिक निकाल लावत यशाची नवी उंची गाठली आहे.

या परीक्षेत शाळेच्या १० विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला असून, २ विद्यार्थ्यांनी ९९ गुण प्राप्त केले आहेत.

या अभूतपूर्व यशात विषय शिक्षक अशफाक खान यांचे योगदान आणि त्यांचे विशेष अध्यापन कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

अशफाक खान यांनी राबवलेल्या नियोजित अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हा कठीण मानला जाणारा विषय विद्यार्थ्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने आत्मसात केला.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद इस्माईल मुनाफ वाडकर, अय्यान अलीखान परभुलकर, अदनान रफीक मेमन, अक्सा आसिफ काझी, तस्नीम इनायत बागकर, नौशीन इकलास मय्यर, सिदरा खलील जुवळे, मुबश्शिरा नसीम उस्मानी, सुमैया इमामसाहेब चंदानुर आणि अतिका अकबर तळघरकर यांनी १०० पैकी १०० गुण मिळवण्याची किमया साधली.

तसेच २ विद्यार्थिनींनी ९९ गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. खान यांच्या प्रयत्नांमुळेच कृषी विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांमध्ये केवळ लोकप्रिय झाला नाही, तर गुणांच्या बाबतीतही या विषयाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

प्राचार्य अय्युब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह अशफाक खान यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नजीर पठाण, लियाकत रखांगे, इक्बाल परकार, जावेद मणियार आणि आरिफ मेमन यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कृषी तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आणि अशफाक खान यांचे शैक्षणिक योगदान यामुळे नॅशनल हायस्कूलचे नाव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाने घेतले जात आहे.