दापोली: दापोली येथील रोगे कॅम्पस, हिंद एज्युकेशन सोसायटी संचालित अझीझ मुल्ला पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या स्थापनेपासून सलग सातव्या वर्षी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शिक्षण क्षेत्रात संस्थेचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अजमेरुन्निसा इसाक हिने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ८८.२० टक्के गुणांसह हुदा नुरुद्दीन हिने द्वितीय, तर ८२.८० टक्के गुण मिळवून अनम अक्रम हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अशरफ अंजारलेकर, अध्यक्ष इकबाल परकार, सीईओ यासिर परकार, सचिव अतिक ऐनारकर, खजिनदार बिलाल साखरकर आणि माध्यमिक विभागाचे चेअरमन मुजीब रुमाने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच रोगे चॅरिटी मुंबईचे नवीद रोगे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रहीमतुल्ला नाईकवाडी, प्राथमिक विभागाच्या चेअरमन मीनाज अंजारलेकर, पर्यवेक्षिका सुमय्या काझी व उषा खांबळ, वर्गशिक्षिका तौसीन मुजावर आणि मार्गदर्शक शिक्षिका कासिफा वाकणकर, उजमा मुंगरुसकर, जैबा ममतुले व झरीना तिसेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशात पालक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे मत व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. शाळेच्या या कामगिरीमुळे दापोली परिसरात आनंदाचे वातावरण आहे.