दापोली : सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२६’ (सिझन ९) ही स्पर्धा ९ आणि १० मे रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ६ ते ६५ वयोगटातील १०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

या सायक्लोथॉनमध्ये ५० किमी कोस्टल सिनिक रूट, शॉर्ट सिटी लूप आणि फॅन राईड अशा विविध गटांचे आयोजन करण्यात आले होते.

५० किमीच्या मुख्य मार्गावर स्पर्धकांनी दापोली, आसूद, सालदुरे, पाळंदे, आंजर्ले, अडखळ, पाजपंढरी आणि हर्णै अशा समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य मार्गाचा अनुभव घेतला. यावेळी पर्यटनाचा आनंद घेत स्पर्धकांनी कोकणी खाद्यपदार्थ आणि रानमेव्याचा आस्वादही लुटला.

शॉर्ट सिटी लूप मार्गावर ठराविक वेळेत जास्तीत जास्त अंतर कापण्याचे आव्हान देण्यात आले होते. यामध्ये आयुष शिंदे याने १०० किमीहून अधिक अंतर पार केले.

स्वराज राजपूरकर आणि हेरंब लोंढे यांनी ८० किमी, तर अर्जुन धारसकर आणि सुनील शिंदे यांनी ७० किमीहून अधिक सायकल चालवली.

तसेच रुद्र बडबे, श्रीराम शिंदे, मेघराज कळमकर आणि अश्विन गोविलकर यांनी ५० किमीपेक्षा जास्त अंतर पूर्ण केले. ६ वर्षीय राजवीर कुटरेकर हा या स्पर्धेतील सर्वात लहान सायकलस्वार ठरला.

स्पर्धेतील सर्व सहभागींना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमासाठी दापोली शिक्षण संस्था, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि मेनेकी अब्सुलूट एनर्जी ड्रिंकचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे आणि नितीन बर्वे यांनी पुढाकार घेतला.