दापोली: रत्नागिरी विभागाच्या दापोली आगारातील दोन एसटी बसचा रुखी फाटा आणि कामत कोंड दरम्यान आज दुपारी भीषण अपघात झाला. पांगारी-दापोली आणि दापोली-पांगारी या मार्गावर धावणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही बसचे मिळून सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बस क्रमांक MH20BL2273 आणि MH20BL3205 या रुखी फाटा परिसरात समोरासमोर आल्या.
यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या असून चालकाच्या बाजूचे पत्रे आणि शो डॅमेज झाले आहेत.
तसेच दोन्ही बसचे बंपर तुटून खाली पडले असून एका बसचे हेडलाईट पूर्णपणे फुटले आहेत.
अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते, मात्र ते उपचार न घेताच स्वतःहून घटनास्थळावरून निघून गेले.
या अपघातावेळी एका बसचे सारथ्य संभाजी ज्ञानोबा फड आणि दुसऱ्या बसचे सारथ्य पुंडलिक शिवाजी केंद्रे करत होते. तर आयुब नजीर शेख आणि योगेश सखाराम गांगुर्डे हे वाहक म्हणून कार्यरत होते.
या घटनेची माहिती मिळताच दापोली आगार व्यवस्थापक आणि सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दापोली शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

