दापोली : शहरात ओढवलेल्या तीव्र सीएनजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता महाबळेश्वर शहराचा पॅटर्न दापोलीतही राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिक रिक्षाचालक आणि व्यावसायिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने, स्थानिकांसाठी पेट्रोल पंपावर स्वतंत्र रांग उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

महाबळेश्वरमध्ये पर्यटन हंगामात होणारी गर्दी लक्षात घेता, स्थानिक टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी इंधन भरण्याकरिता वेगळी व्यवस्था केली जाते.

त्याच धर्तीवर दापोलीतील दोनही सीएनजी पंपांवर स्थानिक नोंदणीकृत वाहनांसाठी राखीव रांग असावी, जेणेकरून त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही.

सध्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिकांना गॅस मिळवण्यासाठी ५ ते ६ तास वाट पाहावी लागत आहे.

प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून स्थानिक व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.