रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, कृषि विज्ञान केंद्र लांजा आणि आसमंत फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ जून या कालावधीत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तीन दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या परिषद दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि महाराष्ट्र तसेच विद्यापीठ गीताने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी शास्त्र परिभाषा कोश समितीचे अध्यक्ष भीमराव उल्मेक उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्यान कृषि विज्ञान केंद्र लांजाचे प्रमुख हणमंते यांनी कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात, पक्ष्यांची निवड, संगोपन, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, रोग नियंत्रण, स्वच्छता आणि बाजारपेठेतील वाढत्या संधी याविषयी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याबाबतची तांत्रिक माहितीही त्यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांना पूरक उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या शिबिरामध्ये शिरगाव, मिऱ्या आणि कसारवेली पंचक्रोशीतील क्रांती बचत गटाच्या अनेक सदस्य महिला हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. या आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी क्रांती महिला बचत गटाच्या प्रमुख सोनाली शिवलकर यांनी समाधान व्यक्त केले.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य केतन चौधरी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सहभागी महिलांशी मुक्त संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
या प्रशिक्षणातून मिळालेल्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागातील अनेक महिला कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळतील आणि त्यांच्यातील उद्योजकतेची भावना अधिक बळकट होऊन महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

