रत्नागिरी: जगातील सर्वात खडतर शर्यतींपैकी एक मानली जाणारी आणि तब्बल ९० किलोमीटर अंतर असलेली ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ रत्नागिरीच्या दोन धावपटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. रत्नागिरीचे सुपुत्र अभिजीत पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
केवळ शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक कसोटी पाहणाऱ्या या शर्यतीत या दोन्ही धावपटूंनी मिळवलेले यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशा प्रकारच्या शर्यती जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तर त्यासाठी अढळ आत्मविश्वास, प्रचंड संयम आणि कधीही हार न मानणारी जिद्द लागते, हे या दोघांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
या अत्यंत खडतर शर्यतीत सहभागी होण्याची आणि ती पूर्ण करण्याची मोठी जिद्द बाळगणाऱ्या अभिजीत पड्याळ याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ९ तास ५१ मिनिटे १२ सेकंद अशी उल्लेखनीय वेळ नोंदवत ही मॅरेथॉन पूर्ण केली.
पहाटेच्या अंधारात सुरू केलेला सराव, ऊन-पावसाची पर्वा न करता घेतलेली मेहनत आणि कधीकधी शरीराने साथ सोडलेली असतानाही मनाने दिलेली साथ, या सर्व संघर्षाचे फळ म्हणजे अभिजीतचे हे यश आहे.
दुसरीकडे, रत्नागिरीमध्ये अनेकांना धावण्याची गोडी लावणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे प्रसाद देवस्थळी यांनीही दुसऱ्यांदा ही कठीण शर्यत यशस्वीपणे पार केली. त्यांनी ११ तास २७ मिनिटे २४ सेकंद अशी वेळ नोंदवली.
ही कामगिरी त्यांच्यातील सातत्य, अनुभव आणि धावण्यावरील निष्ठेची साक्ष देते. अभिजीत आणि प्रसाद यांनी आपल्या पावलांनी केवळ अंतर पार केले नाही, तर मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येकाला एक नवा मार्ग दाखवला आहे.
या दोन्ही धावपटूंनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसारख्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर स्पर्धेत सहभागी होऊन ९० किलोमीटरची शर्यत यशस्वीपणे पूर्ण करणे ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, कोकणाच्या मातीत वाढलेल्या या दोन्ही धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उंचावले असून, त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उदय सामंत यांनी या धावपटूंचे कौतुक करताना व्यक्त केला आहे.

