रत्नागिरी: शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर यांचे कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मांडवी परिसरासह संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुमारे आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता.

सुरुवातीला त्यांना तातडीने रत्नागिरी येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी कोल्हापूर हलवण्यात आले.

तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

महाविद्यालयीन जीवनापासूनच मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी त्या परिचित होत्या. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मांडवी प्रभागाचे नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले होते.

प्रभागातील विविध विकासकामांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.

मंगळवारी दुपारी १२ वाजता मांडवी येथील राहत्या घरावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, मिरकरवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.