स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – 6
एव्हरेस्ट वारीच्या पहिल्याच दिवशी, निसर्गरम्य आणि मनोहारी वातावरणाशी गुजगोष्टी करत आम्ही चार तासांत सुमारे पावणे नऊ किलोमीटरचे अंतर पार केले होते.
या दुर्गम वाटेवर ट्रेक करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे इथली जेवणाची वेळ! दुपारचे असो वा रात्रीचे, जेवण खूप लवकर उरकावे लागत होते. दुपारच्या तृप्त जेवणानंतर शरीराला थोडी विश्रांती दिली आणि गायकवाडसाहेब, मी आणि सौ ‘फाकडींग’ गावातील गल्ल्यांमधून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो.
गावात मानवी वस्त्या आणि घरे तशी बोटावर मोजण्याइतकीच होती, पण पर्यटकांच्या सोयीसाठी असणारी ‘टी हाऊसेस’ मात्र जागोजागी लक्ष वेधून घेत होती. याच भटकंतीत पुण्याहून आलेल्या ‘गिरीप्रेमी’ संस्थेच्या ट्रेकर्सची अनपेक्षित भेट झाली; परक्या मुलखात आपल्याच मातीतली माणसं भेटल्यावर मनाला खूप आनंद झाला.

गावात फिरताना तिथल्या पाळीव कोंबड्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्या आपल्या नेहमीच्या कोंबड्यांसारख्या नव्हत्या, तर देशी कोंबड्यांची ती एक संकरित जात होती.
‘डार्क ब्रम्हा’ आणि ‘प्लायमाऊथ रॉक’ जातीच्या त्या कोंबड्यांच्या अंगावर काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगांच्या रेषांची एक सुंदर नक्षी निसर्गाने बहाल केली होती.
स्वभावाने अत्यंत शांत, पण चपळतेत त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे, आपल्याकडे मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र अंड्यांपेक्षा इथली अंडी वेगळी होती. तपकिरी आणि खाकी रंगाची!

घरांच्या कुंपणापाशी बटाट्याची हिरवीगार शेती डोलत होती, ज्यावर नुकतीच नाजूक फुले उमलू लागली होती. थोडे पुढे गेल्यावर आम्ही ‘दूधकोसी’ नदीच्या तीरावर पोहोचलो. तिचा तो अवखळ, खळाळता प्रवाह आणि तिचा नाद जवळून अनुभवणे हा एक अद्भूत अनुभव होता.
नदीकिनाऱ्याला लागूनच असलेल्या एका उत्तुंग पहाडावर मधमाश्यांनी आपले साम्राज्य उभे केले होते. ती एक अजस्र ‘हनी बी कॉलनी’ होती. बाजूच्या दाट, गर्द वनराईतून अचानक एका अत्यंत गोड, मधूर शिळेचे स्वर कानावर पडले. नजर फिरवली तर एक विटकरी-किरमिजी रंगाचा देखणा पक्षी झाडांच्या फांद्यांवर बागडताना दिसला. तो सुमधूर गाणारा ‘रुफस सिबीया’ (तांबूस सिबीया) होता. हिमालयाच्या कुशीत आढळणाऱ्या ‘लाफिंग थ्रश’ परिवारातील हा मानकरी!

‘ऱ्होडोडेंड्रॉन’च्या लालभडक, फुललेल्या फुलांमधील मकरंद पिण्यासाठी त्याची अखंड लगबग सुरू होती. लहान कीटक, अळ्या, कोळी आणि झाडांची छोटी फळे हेदेखील त्याचे खाद्य. त्याची ती सुस्पष्ट शीळ जंगलात दूरवर ऐकू येत होती. निसर्गाच्या चक्रात परागीकरणाची एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी हा छोटासा जीव पार पाडत असतो.आपल्याच धुंदीत गाणारा हा ‘तांबूस सिबीया’ सुरुवातीला एकटाच होता. पण, काही वेळातच त्याचे दोन-तीन सवंगडीही तिथे अवतरले. एक ‘होला’ फांदीवर बसून घुमत होते. त्यांचा कंठ घुमताना फुगत होता. बहुधा जोडीदाराचा मिळालेला संकेत घेवून ते त्या दिशेला उडून गेले.
परतीच्या वाटेवर असताना मगाच्या कोंबड्या जमिनीवर चोच मारत आपले खाद्य टिपण्यात मग्न होत्या. तेवढ्यात एका कोपऱ्यातून ‘चिव-चिव’ असा वेगळाच आवाज आला. वाटले सूर्यपक्षी असावा, म्हणून मी रोखून पाहिले; पण तो होता ‘ग्रीन बॅक्ड टीट’ ! हा चपळ आणि देखणा पक्षी! मराठीत याला ‘बल्गुली’, ‘हिरवी बल्गुली’ किंवा ‘रामगंगारा’ म्हणून ओळखले जाते. त्याचे डोळे, गळा आणि छातीचा मध्यभाग चमकदार काळ्या रंगाचा होता. तर, गालावर पांढरे शुभ्र ठिपके उठून दिसत होते.
त्याची पाठ हिरवट ऑलीव्ह रंगाची आणि पोटाकडचा भाग पिवळसर होता. त्याचा शिळेसारखा आवाज जंगलात सहज ओळखू येतो; शिवाय वेगवेगळे आवाज काढण्यात तो चांगलाच पटाईत असतो.

आजूबाजूला उंचच उंच पाईनच्या झाडांसोबतच थंड, पर्वतीय प्रदेशात आढळणारे सदाहरित सूचीपर्णी ‘फर’ वृक्ष ताठ मानेने उभे होते. निसर्गाची गंमत बघा, बर्फवृष्टी झाली तरी या वृक्षांच्या शंकूच्या आकारामुळे त्यांच्यावर बर्फ साचून राहत नाही, तो सरळ घसरून खाली पडतो. निसर्गाने प्रत्येक जिवाला आणि वनस्पतीला इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याची कशी अचूक कला शिकवली आहे, याचेच हे उदाहरण!
या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतानाच, वाटेत पाठीवर अवाढव्य ओझे वाहून नेणारे मेहनती स्थानिक मजूर दिसत होते. अगदी बांधकामाच्या अवजड लोखंडी सळ्यांचा भारही ते आपल्या पाठीवर अत्यंत सहनशीलतेने वाहून नेतात, हे पाहून त्यांच्या कष्टाची जाणीव झाली.
आमच्या ‘टी हाऊस’च्या दारात एक लहान मुलगी आपल्याच नादात आकाशाकडे पाहत खुदकन हसत होती. तिची नजर आकाशातील पक्षांच्या एका अथांग थव्यावर खिळली होती. शेकडो पक्षी आकाशात एखाद्या लाटेसारखे, जणू काही लयबद्ध नृत्य केल्यासारखे आपले आकार बदलत उडत होते. त्या बहुदा ‘गुलाबी मैना’ किंवा ‘भोरड्या’ असाव्यात.

आपल्याकडेही हिवाळ्यात सांजवेळी असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. आकाशात निर्माण होणारे हे पक्षांचे वेगवेगळे आकार आणि त्यांची वेगवान हालचाल पाहून बाज, ससाणा किंवा गरुडासारखे शिकारी पक्षीही गोंधळात पडतात. शिवाय, अशा प्रकारे थव्याने उडाल्यामुळे त्यांना आपली शारीरिक उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते, हे विज्ञानाचे गुपित!
निसर्गाचा हा सुंदर चमत्कार आणि आकाशाच्या कॅनव्हासवर निर्माण होणारी ही नयनरम्य नक्षी पाहून ती लहानगी मनोमन सुखावत होती, तिची कळी खुदकन खुलत होती. निसर्ग आणि त्या लहान मुलीचा बराच वेळ चाललेला हा संवाद माझ्या आणि ‘सौ’ च्या मनाला सुखावून गेला. हे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात आणि मनात साठवून आम्ही टी हाऊसवर परतलो.
आता सायंकाळचे सात वाजले होते. हीच इथली रात्रीच्या जेवणाची वेळ! गरमागरम चिकन, डाळ-भात आणि सूपचा आस्वाद घेत आम्ही सर्वजण शेखर आणि कस्तुरीकडून पुढच्या ट्रेकची माहिती आणि सूचना ऐकण्यात मग्न झालो.

उद्या आम्हांला तब्बल १४ किलोमीटरचे अंतर पार करायचे होते; तेही २६१० मीटरच्या उंचीवरून थेट ३५०० मीटरवर पोहोचायचे होते! उंची वाढणार तसा हवेतील गारठा कमालीचा वाढणार होता आणि प्राणवायू कमी होणार होता. त्यामुळे उद्या पहाटे साडेसहा वाजताच नाश्ता उरकून पायपीट सुरू करणे भाग होते.
खोलीबाहेर गारठा चांगलाच वाढला होता, पण पोटात गेलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीरात एक सुखावह उब निर्माण झाली होती. उद्याच्या कठीण प्रवासाची मानसिक आणि शारीरिक जुळवाजुळव करता करता, कधी झोपेच्या गावी पोहोचलो, हे समजलेच नाही..
– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101

