स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी… भाग – 7

पहाटेचे ठीक चार वाजले असतील. लख्ख जाग आली तीच मुळी घराबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजाने. हिमालयातील पहाट आणि त्यात हा पाऊस! सकाळी साडेसहाला आम्ही सगळे नाश्त्यासाठी खाली रेस्टॉरंटमध्ये.

जमलो. प्रवासाची पूर्वतयारी म्हणून गरम पाण्याने बाटल्या आणि थर्मास भरून घेतले. आज ट्रेकचा दुसरा, पण खऱ्या अर्थाने कसोटी पाहणारा दिवस होता. विश्वासू पोर्टर्सनी डफल बॅगा पाठीवर चढवल्या आणि ते आमच्या पुढे निघाले.

बाहेर हवेत कमालीची थंडी होती आणि निसर्गाने धुक्याची पांढरीशुभ्र चादर पांघरली होती. हेच धुकेलेले सौंदर्य कॅमेऱ्यात टिपून, सकाळी साडेसात वाजता आम्ही पाऊलवाटेला लागलो.

आमची वाटचाल दूधकोसी नदीच्या तीरावरून सुरू झाली. वाटेच्या दोन्ही बाजूंना उत्तुंग पाईनचे वृक्ष जणू आमचे स्वागत करण्यासाठी दिमाखात रांगेत उभे होते. अवखळ, खळाळत्या दूधकोसीला ओलांडण्यासाठी जागोजागी टांगते, झुलते पूल लावलेले होते.

या पुलांवरून निसर्गाचे रौद्र पण लोभस रूप पाहत, फोटो काढत आमची पावले वर-वर पडत होती. वाटेत मध्येच एक कडा ढासळलेला होता.

केवळ एकाच व्यक्तीला कसाबसा पुढे जाता येईल, अशी चिंचोळी आणि खडतर वाट समोर आली. जराही बेसावध राहिल्यास थेट खाली धावणाऱ्या दूधकोसीच्या अंगावर पडण्याची भीती! काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग होता, पण आम्ही सावधपणे तो टप्पा पार केला.

गर्द वनराजीतून चालताना पावश्याची ‘पेर्ते व्हा..’ अशी घाई सुरू होती. तेवढ्यात हिरव्या पानांच्या आडोशातून पांढरे-तपकिरी पट्टे असणारी एक देखणी शेपूट दिसली तो निसर्गाचा जादूगार ‘टकाचोर’ (Tree pie) होता.

स्थानिक केसाळ श्वानही आमच्या प्रेमात पडले होते, ते लाडाने आमच्या मागोमाग येत मध्येच जवळ बसत होते. मध्येच याक आणि गाईंचा कळप रस्ता अडवून उभा राहायचा. चालून थकलो की पाणी पिण्याच्या बहाण्याने चिक्की, ड्रायफ्रूटचे लाडू आणि चिरमुऱ्याच्या लाडूंचा आस्वाद घेतला जात होता.

उन्हं वर येताच हवेतील उष्मा वाढला. थंडी गायब होऊन अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. जॅकेट, टी-शर्ट काढून मी ट्रेक सुरू ठेवला. अशाही परिस्थितीत आमचे ‘फोटोसेशन’ हे जणू काही अनिवार्य शास्त्र असल्यासारखे अविरत सुरूच होते!

वाटेत बटाट्याची लालसर फुले डोकावणारी हिरवीगार शेती मनाला सुखावत होती. एका भल्या मोठ्या खडकाच्या आडोशाने निसर्गतःच एक शांत, थंडगार गुहा तयार झाली होती; तिथला गारवा सुखावून गेला. पुढे एका ठिकाणी स्थानिक कारागीर दगड घडवून ‘टी हाऊस’चे बांधकाम करत होते. विशेष म्हणजे, या दगडी बांधकामात सिमेंट किंवा वाळूचा लवलेशही नव्हता! निसर्गातील छोटे खडक आणि खडी-कपरी यांच्या साहाय्यानेच ते दगड एकमेकांत घट्ट सांधले जात होते.

पुढे चालताना लालभडक ‘ऱ्होडोडेंड्रॉन’ (बुरांश) ची फुले मनाला भुरळ पाडत होती. त्यांचा मकरंद चाखण्यासाठी ‘रुफस सिबीया’ पक्षी इकडून तिकडे बागडत होता. ओहोळाच्या पाण्यावर ‘जल थिरथिरा’ (Water Redstart) ‘राखाडी जलथिरथिरा’ आपली हजेरी लावून होते, तर सातभाई आपल्याच नादात किडे शोधत उड्या मारत होते. लांब दांडक्यावर खालून वरच्या दिशेने उमललेली, घंटेच्या आकाराची गुलाबी ‘फॉक्सग्लोव्हज’ची फुले या दगड-धोंड्यांच्या वाटेवर मनाला उभारी देत होती.

चालता चालता आम्ही नेपाळ सरकारच्या वन तथा वातावरण मंत्रालयाच्या ‘सागरमाथा राष्ट्रीय उद्यान’ कार्यालयाच्या जोरसेल्ले तिकीट काउंटरजवळ पोहोचलो. प्रवेशद्वारावर एक आठवणीचा फोटो काढून आम्ही पुढील बेभरवशाच्या दगडी पायऱ्यांवरून मार्गक्रमण सुरू केले.

चढ-उताराचा रस्ता पार करत, सलग चार तासांची पायपीट करून सकाळी साडेअकरा वाजता आम्ही एका टी हाऊसवर पोहोचलो. तिथे अतिशय स्वादिष्ट अशा गावरान चिकनवर ताव मारला. त्या जेवणाने अंगात एक नवी ऊर्जा संचारली.

जेवणानंतरचा ट्रेक अधिकच दुर्गम होता. वळण घेणारे तीव्र चढ आणि ढासळलेली पायवाट आमचा कस पाहत होती. आप्पाकाकांच्या घरच्या लाडूंनी आम्हाला खरी ताकद दिली.वाटेत अनेक परदेशी गिर्यारोहक भेटत होते. विशेष आनंद तेव्हा झाला, जेव्हा महाराष्ट्रातील ठाणे, बदलापूरचे ट्रेकर्स ‘इबीसी’ (Everest Base Camp) यशस्वी करून परतताना भेटले. पुण्याचे काही सवंगडी तर आमच्या सोबतच चढत होते.

अनेक छोटे-मोठे पूल ओलांडल्यानंतर अखेर ऐतिहासिक ‘हिलरी पूल’ नजरेत भरला. त्याच्या भव्य पार्श्वभूमीवर मनसोक्त फोटोसेशन झाले. “हा पूल ओलांडल्यावर डान्स करायचा आणि रील बनवायची,” ही नुपूरची कल्पना सर्वांनाच भावली. पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचताच, हातातील ट्रेकिंग पोल खांद्यावर आडवा धरून आम्ही ‘काठीनं घोंगडं घेवू द्या की रं..’ ‘गणा धाव रे..मना पाव रे..’या गाण्यावर अस्सल मराठी ठेका धरला! त्या नृत्याने शरीराचा सगळा शिणवटा एका झटक्यात पळून गेला.

पुढचा मार्ग घनदाट पाईन आणि देवदार वृक्षांच्या जंगलातून जात होता. झाडांची सावली असली, तरी जेवणानंतरची तीव्र चढण असल्यामुळे जीव चांगलाच दमू लागला होता. नदीपात्रातील दगडावर ‘व्हाईट कॅप्ड रेडस्टार्ट’ (पांढऱ्या मुकुटाचा तांबट) ‘श्वेतशीर्ष’ शिकारीसाठी दबा धरून बसलेला दिसला.

पुढे जाताच अचानक धष्टपुष्ट कावळ्यांचा कर्कश आवाज कानी पडू लागला. कावळे दिसले की वस्ती जवळ आली समजावी! निरखून पाहिले तर त्या कावळ्यांची चोच लाल होती. तो कावळा प्रजातीतील ‘कस्तूर’ (Chough) पक्षी होता.

अखेर… समोर ‘नामचे’चे स्वागतद्वार दिसले! ते पाहताच मनात आनंदाची लहर उठली आणि थकवा कुठल्या कुठे पळून गेला. आज तब्बल ९ तासांत जवळपास साडेचौदा किलोमीटरचे अंतर आम्ही पार केले होते. आजच्या ट्रेकने आमचा घाम काढला. आमची कसोटी घेतली. पण, निसर्गाच्या अद्भुत खजिन्याचे दर्शन घडवत आम्हाला सुखरूप ‘नामचे’च्या कुशीत आणून सोडले.