दापोली : तालुक्यातील भिवबंदर-आघारी येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकल्पाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

दापोलीचा निसर्ग, शेती, बागायती आणि मच्छीमारी उद्ध्वस्त करणारा हा विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत येथे होऊ देणार नाही आणि याविरोधात ऐतिहासिक लढा उभारू, असा थेट इशारा शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला आहे.

दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला नरेंद्र करमरकर, ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे आणि नगरसेवक संदीप चव्हाण उपस्थित होते.

दापोलीची मुख्य ओळख ही पर्यटन, विस्तीर्ण समुद्रकिनारे, मासेमारी, आंबा-काजूच्या बागा आणि निसर्गसंपन्न परिसर अशी आहे. अशा ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा निर्णय घेताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक होते, असे गुजर यांनी स्पष्ट केले.

आमचा विकासाला विरोध नाही, मात्र दापोलीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाला आमचा सक्त विरोध राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या विनाशकारी प्रकल्पामुळे मच्छीमार, शेतकरी आणि बागायतदारांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने दापोलीत त्याऐवजी जहाजबांधणी किंवा ऑटोमोबाईलसारखे पर्यावरणपूरक उद्योग आणावेत आणि त्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गुजर यांनी केली.

यावेळी त्यांनी आमदार योगेश कदम यांच्या दुटप्पी भूमिकेवरही सडकून टीका केली. एकीकडे प्रकल्पाची माहिती नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे त्याला ग्रीन प्रकल्प म्हणायचे, ही त्यांची परस्परविरोधी भूमिका असल्याचे गुजर यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच पालकमंत्री उदय सामंत जर खरोखरच शेतकऱ्यांच्या बाजूने असतील, तर शासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊनच यापुढील निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

या प्रस्तावित प्रकल्पाच्या आसपास सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण व्यवहारांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी गुजर यांनी केली आहे.

आता हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित राहणार नाही, तर गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत दापोलीचा निसर्ग आणि स्थानिकांचे हक्क वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्याचा निर्धार गुजर यांनी यावेळी व्यक्त केला.