स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी…भाग – 5
आज ट्रेकचा पहिला दिवस होता. अतिशय उत्साह आणि उर्मी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..!’ ची घोषणा झाली आणि सर्वांचे पहिले पाऊल ‘इबीसी’च्या दिशेने पडले. लुकला च्या नागरी भागातून जाताना गोबऱ्या गालांच्या लहान मुलाचे दर्शन झाले.
निसर्गातःच त्यांच्या गालावर लालसर छटा ‘ब्लश’ ची आठवण देत होत्या. आपल्या पित्याच्या मांडीवर कोवळी उन्हं खात ती बसलेली. पासंग ल्हामू गेटजवळ सर्वांनी छबी टिपली. येथेचे हिमालयीन जहाज ‘याक’ चे दर्शन देखील झाले.

‘सागरमाथा राष्ट्रीय उद्यान आणि बफर क्षेत्र’ च्या कार्यालयाजवळ आलो. तेथे नियमावलीचा फलक दर्शवत होता. खरतरं ‘पेर्ते व्हा…पेर्ते व्हा..’ असा संदेश देणारा पावश्या अनेक ठिकाणी साद घालताना अगदी सुरुवातीलाच ऐकायला मिळाला होता. आता ‘सागरमाथा राष्ट्रीय उद्यान आणि बफर झोन’ सुरु होणार होते.
1148 किमी वर्गचे हे क्षेत्र होते. 1979 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हिमबिबट, मस्क डिअर जे कस्तुरीसाठी प्रसिध्द असते आणि दुर्लभ रेड पांडा हे प्राणी आणि हिमालयीन मोनल, ब्लड पिझंट या प्रमुख पक्षांचा वावर यात होता.
शिवाय पाईन, हेमलॉक, फर, जुनिपर, बर्च, -होडोडेंड्रॉन ही प्रमुख वृक्ष संपदा होती. म्हणजे माझ्या सारख्याला पक्षी-प्राणी दर्शनाची ही पर्वणीच होती. आम्ही समुद्रसपाटीपासून 2070 मीटर उंचीवर होतो. पोलीसांचे ‘पर्यटक प्रहरी शाखा, लुकला जिल्हा सोलुखुम्बु’ या फलकाने आम्हाला त्याची जाणीव करुन दिली.
सतत बडबड्या राखी वटवटीने आपले अस्तित्व जाणवून दिले. सूर्यपक्षी आपली बाकदार चोच घेवून मकरंद शोषणात गुंग झालेला. तर, आम्ही त्यांच्या प्रदेशात आलोय, याची जाणीव सगळ्या जंगलात सातभाई आपल्या कर्कश आवाजाने करुन देत होते.

सुभगाची शीळ गर्द झाडीत लुप्त होत होती. सकाळची न्याहरी करणारा सातभाई कुळातील ‘लाफींग थ्रश’ ताव मारताना दिसला. चिखल्या, खाटिक निवांतपणे निरीक्षण करत तारेवर बसून होते.
वाटेत शेर्पा खेचरावरुन साहित्य घेवून येत-जात होते.
परदेशी गिर्यारोहक देखील येत-जात होते. लुकला येथून सर्व बांधकाम साहित्य आपल्या पाठीवरुन नेणारे मजूर भेटत होते. ही मानवी वाहतूक त्यांचे भीषण दारिद्रय आणि कमालीची मेहनत याचे दर्शन घडवून जात होती. आपल्याकडील ‘वडाप’ प्रमाणे आकाशात हेलिकॉप्टरच्या सतत फेऱ्या चालू होत्या. यात प्रामुख्याने सामानाची ने-आण आणि पर्यटकांची वाहतूक देखील होती.
पांढऱ्या शुभ्र खळाळणाऱ्या अवखळ नदीच्या किनाऱ्यावरुन आता आमचा ट्रेक सुरु होता. तिच्या पाण्यावरुन तिला ‘दूधकोसी’ नाव मिळालेले होते. प्रवाहातील दगड-गोट्यांवरुन अंग झेपावत ती अधिक आवाज करत पुढे धावत होती. तिचा तो प्रचंड आवाज या शांततेत अधिक उग्र वाटत होता.

दूधकोसीला पार करण्यासाठी झुलता, टांगता पूल वाटेत लागला. तो ‘थाडाकोसी सस्पेन्शन ब्रिज’ होता. दूधकोसीची उपनदी थाडाकोसी यावर बांधलेला 350 मीटर लांबीचा आहे. फाकडींग आणि घाट या गावांच्या दरम्यान तो आहे. वाटेत लागणारा हा पूल लोकप्रिय फोटो पॉईंट आहे.
या पुलावरुन छबी टिपत असताना आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याने भुरळ पाडली शिवाय ‘कुसुम कांगुरु’ या पर्वताचे विहंगम शिखर या पुलावरुन दूरवर नजरेत भरत होते.
वाटेत ‘मणी भिंत’ म्हणजेच ‘बौध्द प्रार्थना दगड’ लागला. ‘ओम मणि पद्में हूँ..’ हा बौध्द धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा तिबेटी बौध्द लिपीमध्ये कोरलेला मंत्र होता.

मध्यभागी खाली एका ठिकाणी ‘धर्मचक्र’ कोरलेले होते. गिर्यारोहकांचा प्रवास सुरक्षित व्हावा त्यांना ‘गुड लक’ मिळावे म्हणून या मार्गावर असे दगड ठेवलेले आहेत.
बौध्द परंपरेनुसार या मणी भिंतीच्या डाव्या बाजूने चालत पुढे जाणे अत्यंत आवश्यक मानले जाते. याला आदर दाखविण्याची पध्दत मानतात. हा हिमालयातील शेर्पा संस्कृतीचा आणि बौध्द वारशाचा एक सुंदर आणि पवित्र भाग आहे. जो तिथल्या प्रत्येक प्रवासाला ऊर्जा आणि आशीर्वाद देतो.
सुई सारखी टोकदार पानांची ओळख आणि शंकूच्या आकाराची खवल्या मांजराच्या पाठीप्रमाणे कडक फळे असणाऱ्या पाईन वृक्ष राजीतून हा प्रवास थेट सुरु असतानाच, बटाट्याची शेती तुकड्यांमध्ये दिसू लागली.
गाव, फाकडींग जवळ आल्याचे ती खूण होती. नेपाळचे राष्ट्रीय फूल असणारे ‘लाल गुरास’ अर्थात ‘ऱ्होडोडेंड्रॉन’ची लालसर फुले जागोजागी लक्ष वेधून घेत होती. रानटी पांढऱ्या गुलाबाची डवरलेली फुले मन प्रफुल्लीत करत होती.
हाताच्या पंजासारखी एका दांड्यावर खालून वरच्या दिशेने एका पाठोपाठ एक अशी मनोऱ्यासारखी ‘ल्युपिन’ ची अत्यंत सुंदर मोहक, देखण्या फिकट गुलाबी आणि जांभळ्या छटांची फुले भुरळ पाडत होती.
वेलकम टू फाकडिंग’ हा फलक दिसला. गिर्यारोहकांचा फाकडींग हा मुक्कामाचा पहिला दिवस ठरतो. समुद्रसपाटीपासून 2610 मीटर उंचीवर आम्ही पोहचलो होतो. अतिशय उत्साहाच्या वातारणात आणि आनंदी मनाने आम्ही हॉटेलवर पोहचलो. खरं तर येथे ‘हॉटेल’ ला ‘टी हाऊस’ हे नामाभिधान आहे.
शेखर तमांग यांनी आमच्या जेवणाची ‘ऑर्डर’ घेतली. या ट्रेकमध्ये वाटेत येताना वर्तुळाकार ‘रिंग सेल रोटी’ चा आस्वाद घेतलेला होता. दुपारी जेवणात चिकन डाळ भाताबरोबर आप्पाकाकांनी (याच नावांने आप्पासाहेब मुंडासे हे पथकात प्रसिद्ध पावलेले.) आवर्जून आणलेल्या सोलापुरी कडक पापड भाकरी सोबत शेंगदाण्याची आणि जवसाच्या चटणीचा बेत काही औरच मजा देवून गेला.
– कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
9403464101

